17 ऑगस्ट 2004
आजच सकाळी घरुन आलो. 12 ऑगस्टला घरी गेलो होतो. डॉ. लोहकरेंनाही जाता जाता भेटलो. त्यांनी 15 ऑगस्टनंतर गोळ्या बंद करण्यास सांगितल्या आहेत. 28-29 ऑगस्टला भेटायला ये म्हटलेत. डॉ. खराडेंनाही भेटलो.
लोहकरे डॉक्टरांनी कब्बडी खेळण्याचा धोका घेऊ नकोस असे सांगितले होते. तर डॉ खराडेंनी मला पाचव्या क्रमांकावर खेळण्याचा सल्ला दिलाय. आई दादांनी तर कब्बडी खेळायची असेल तर "ऍग्री' सोड म्हणून दम दिलाय.
टोमॅटो सुरु आहेत. मानसांअभावी सर्वांवर कामाचा ताण पडतोय. काल 6 मावळी 120 रुपये जोडीने कामाला नेली होती. सध्या बाजार 450 ते 510 रुपये सुरु आहे. परंतू 40 टक्के मालावर किड व काळा चट्टा आहे. यामुळे नुकसान खूप होतंय. परंतू मार्केट चांगलं असल्याने या कमी गळीतातही परवडेल असं वाटतंय...